–प्रा.किरण दशमुखे
पहाटेच्या साखरझोपेचं भाग्य सर्वांनाच लाभतं असं नाही. मात्र त्यासाठी सर्वांचाच प्रयत्न असतो. पण या प्रयत्नावर कुठे तरी पाणी पडतं व साखरझोपेचं पाणी पाणी होतं. मनुष्य चिडतो, रागावतो पण काहीच करता येत नाही. कुणाला बोलण्याइतकी हिंमत नसते.
आजकाल कोण कुणाचं ऐकतयं, अर्थात झोपेच्या बाबतीत काही मंडळी अशीही असते, चादर पांघरली की तेवढंच त्यांचं जग बनतं. बाहेरच्या हालचालींशी त्यांचा काडीमात्र संबंध नसतो. त्यांच्या झोपेवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. आहे असाच माझा एक मित्र कुंभकर्ण ! नावाप्रमाणेच अतिशय सुस्त, सकाळी उठविल्याशिवाय कधीहा उठायचा नाही, सकाळचं नळाचं पाणी मिळालं नाही तरी त्याला त्याचं काही नाही. अंघोळ केली नाही तरी चालतं.
पण माझं मात्र झोपेचं तंत्र फारच कठीण आहे. कधी काळी रात्री साधी मांजर जरी चोर पावलानं खिडकीतून आली तरी मला जाग येते. रामप्रहरी सदुबाबांच्या ‘ॐ नमः शिवाय’ च्या गजराने मला पहिली जाग येते. पण त्याचं काही वाईट वाटत नाही. उलट मला ते पुण्यप्रदच वाटतं.
पण नंतर मात्र सुरू होतात. ‘दिदी तेरा देवर दिवाना..’ पूर्वीचे वासुदेव गेले आणि हे वासुदेव आले. त्याने माझी पुरती झोप मोडते व त्याचा राग येऊन मी ऑऽ आईऽऽ करीत एक मोठी जांभई देत उठतो. बाहेरून भांड्यांचा खणखणाट होण्याचा आवाज येतो. त्यावरून नळाला पाणी आल्याचा सिग्नल मिळतो. मी हंडा घेऊन पाणी भरण्यासाठी निघतो कारण आम्ही अजून बॅचलर आहोत. सौ. मिळण्याचं भाग्य आम्हाला अजून लाभलं नाही आणि सध्या तरी तशी अपेक्षा नाही बुवा! कारण आम्ही आमच्या शेजारच्याच गणूभाऊंना पाहतो.
बायको असून त्या बिचाऱ्याला सारी कामं करावी लागतात. पाणी भरण्यापासून ते भांडी घासेपर्यंत. लोक नावं ठेवतात.पण काय करणार बिचारी बायको आजारी असते ना! (असते की नाही ते तिलाच माहित) मला तसं कुणी नावं ठेवीत नाही पण अधुनमधून बायका मात्र सल्ला देतात. त्यांनाही मग गणुभाऊंकडे बोट दाखवितो. जाऊ द्या. बिचाऱ्या गणुभाऊंची उगाचच दवडायला नको. ते काही तसे एकटे थोडेच आहेत. घरोघरी मातीच्याच चुली. नाही म्हणायला काळ बदललाय. घरोघर गॅस, सुर्यचूल काय काय नवीन आलंय. (तेव्हा कुणीतरी नवीन म्हण शोधायला हवी.)
हं! जाऊ द्या बाकीचं. तर काय झालं. मी पाणी घेण्यासाठी हंडा घेऊन निघालो. तत्पुर्वी आरशात बघून केस नीट विंचरले. तोंडावर हात फिरवला. कारण नळावर पाणी भरण्यासाठी मुलीही असतात ना! मग नीट जायला नको! बीचाऱ्या मुली खूप चांगल्या. मी गेल्यावर त्या लगेच बाजूला झाल्या. नळाखालील हंडा भरल्यावर एकोने मला तुम्ही भरुन घ्या म्हणून सांगितले. पण ते मात्र एका बाईसाहेबांना सहन झालं नाही.
त्यांचा नंबर नसतांना त्या तावातावाने पुढे आल्या व माझा हंडा काढून घेतला आणि त्यांचा हंडा लावला. एवढे करून त्या थांबल्या नाहीत. त्यांनी त्या बिचाऱ्या पोरीला भडीमार शिवीगाळ सुरू केली. तो हंडा भरेपर्यंत ती फायरिंग सारखी चालू राहिली. (तो हंडा लवकर भरावा म्हणून मी नळाला मनातून विनंती केली की बाबा जरा जास्त फोर्स कर.) बिचाऱ्या त्या मुलीला समाजसेवेचे हे फळ मिळाले होते. तिला खूप वाईट वाटले. मी तिला मनावर घेऊ नका असं सांगून तिचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न केला.
बाईसाहेबांचा हंडा भरून झाल्यावर मी कोणी न सांगता माझा हंडा नळाखाली लावला. कारण मला खात्री होती इतर मंडळी तशी समजूतदार आहे. हिच काय तेवढी बया अशी होती. तिला सर्वजण घाबरतात. कुणी काही बोललं तर ती त्याचे बाराच वाजवते. म्हणून मग कुणीच काही बोलत नाही. आणि म्हणूनच मग तिची हिटलरशाही वाढत गेली होती.
पण काय गंमत म्हणायची, त्या दिवशी दाणकन आवाज आल्यामुळे सर्वांनी मागे फिरून बघितले. बघतो तर बाईसाहेब पडल्या होत्या. नळावरील कुणीही त्यांना हात देण्यासाठी पुढं गेलं नाही. उलट मनातल्या मनात म्हणाले असतील असंच पाहिजे तिला. पण मी मात्र धावतच बाईसाहेबांना मदतीचा हात दिला. त्यांना उभे केले. त्यांचा हंडा उचलला. त्याचा आकार कोणता असावा हे मला न सांगता येण्यासारख्या तो झाला होता. आईआई ग ऽऽ करीत बाई उठल्या व मला पहाताच त्या वरमल्या.
मी त्यांना धीर देत त्यांच्या घरी पोहचवले. एवढेच नाही तर माझा एक हंडा पाणी मी त्यांना घरी नेऊन दिले. त्यांना भयंकर त्रास होत होता. शरीर लठ्ठ असल्यामुळे अंग फार ठणकत होतं. पण तशातही त्या म्हणत होत्या, कुणा पापाणीनेच मला दृष्ट लावली. अशा वेळी तिला सुधारण्याची चांगली संधी मला मिळाली होती. कारण संकटकाळात माणसाला दुसऱ्याचा आधार हवासा वाटतो.
मी त्यांना तुम्ही का पडलात याचे खरे कारण सांगितले. न्हाणी घरातले सांडपाणी रस्त्यावर येते व त्यामुळे चिखल होतो. त्या गल्लीकडे पाहिले तर वाटतं तिला बिचारीला बारमाही ओलं राहण्याचा शापच मिळाला असावा व मग बिचारी कंटाळून असंच एकेकाला लोळवते. तेव्हा बाईंनी पहिली प्रतिज्ञा केली. न्हाणी घरातील सांडपाणी कदापीही रस्त्यावर येऊ दिलं जाणार नाही. सुरूवात तिच्या घरापासूनच केली व गड्याला अंगणात खड्डा खोदण्यास सांगितले. तिच्या या भांडखोर वृत्तीचा असा सदुपयोग करून घेण्याचे मी ठरविले.
इकडे मी हंडा भरण्यासाठी नळावर आलो. पण कुणीही हंडा भरू दिला नाही. कारण ती सर्व विरोधी पार्टीची होती. मी त्या पार्टीत नसूनही बाईसाहेबांचं डोक बदलविण्यात यशस्वी झालो होतो. पण ते कळण्यासाठी दुसरा दिवस उगवावा लागला. दुसऱ्या दिवशी बाई मार लागलेल्या अंगाच्या वेदना सोशीत हंडा घेऊन नळावर आल्या.
त्यांना पाहताच सर्वजण बाजूला झाले. कारण बाईंचा नियमच होता, ‘आधी पाणी बाईंच, मग इतरांच.’ कुणी आड आलं तर त्याची गत व्हायची, पण आज मात्र घडलं वेगळंच त्या पाण्यासाठी पुढे आल्याच नाहीत. मागे रांगेत हंडा ठेवला व उभ्या राहिल्या. हे घडलं तरी कसं असं मनाशीच म्हणून सर्वांनी तोंडात बोटे घातली व काय आश्चर्य म्हणून विचारण्यासाठी सर्व जण माझ्याकडे आलीत ती पुष्पगुच्छ घेऊनच.
असेच दर्जेदार ललित लेखन आपल्यापर्यंत थेट पोहोचण्यासाठी येथे क्लिक करा
Read more about Trimbakeshwar temple