-किरण दशमुखे
आजची सकाळ माझ्यासाठी खूप ‘स्पेशल’ होती. मला जर ‘डायरी’ लिहिण्याची चांगली सवय राहिली असती तर आजच्या सकाळाचे वर्णन मी नक्कीच “सुवर्ण” अक्षरांनी लिहून ठेवले असते. इतकी प्रसत्र सकाळ प्रथमच मी अनुभवत होतो. सकाळी सकाळी अंथरूणात उठून पाहतो तर माझाच काय कुणाचाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असले दृश्य. मला तर आपण हे स्वप्न पाहतोय की, वास्तव हेच काही वेळ कळत नव्हते.
मी स्वतःला चिमटी घेऊन पाहिले आणि कळवळलो. आपण खरेच जागे आहोत याचे भान आले. पण हे काय! एरवी कडकलक्ष्मी म्हणून सर्वांना प्रचलित असणारी ‘सौभाग्यवती आज मात्र पायांजवळ बसून पाय चेपित होती. कसला एवढा हा बदल ! मला काही कळत नव्हतं. एक तर तिच्या डोक्यात नेहमीच ‘स्त्री मुक्ती संघटनेचे’ विचार असतात. तेव्हा पुरूषांपासून मुक्ती मागणाऱ्या या स्त्रीला कशी काय एका पुरूषाची सेवा करण्याची इच्छा झाली, हेच कळत नव्हते.
ही सेवा मात्र आपल्याला भयंकर महाग पडेल या विचाराने माझ्या आनंदीपणाला ग्रासून टाकले होते. कारण माझा इतर वेळचा अनुभव असाच होता. हिला चांगली साडी घ्यायची असली की, आठ दिवस माझ्याशी अगदी गोड गोड बोलते. चांगला स्वयंपाक करून खाऊ घालते. माझ्या कपड्यांना स्वतः इस्त्री करून देते; आणि मग हळूच तुम्हाला हा ड्रेस किती छान दिसतो. म्हणून मी तिच्या सोबत दुकानात जातो.
दुकानदाराने कंटाळा न करता भराभर ही नाही ती साडी दाखवायला सुरवात केली. त्याला खात्री होती या गिऱ्हाईकाला साडीदिल्याशिवाय जाणार नाही. ही नको ती, असे करता करता चांगली रंगीत डिझाईनची प्रिंटेड साडी एकदाची पसंत केली. (साडीवाल्यांच्या तावडीतून खरेदी न करता सुटणं फार कठीण असतं हे ज्याला जमतं त्याचं मला तर खूप कौतुक वाटतं.) एकदाची सौभाग्यवतीची खरेदी आटोपली. आता दुकानदाराने बाळ्याकडे बघत लहान मुलांच्या चिल्ड्रन्स वेअर दालनाकडे बोट दाखवत दिवाळीसाठी माल आलेला आहे म्हणून पाहण्याची विनंती केली. मी नको म्हणत असतांना मात्र तो, “अहो पाहून तर घ्या! घेतलंच पाहिजे असा कुठे आमचा आग्रह आहे!” असं म्हणाला आणि “पाहण्यासाठी आम्ही काही पैसे घेत नाहीत!” या त्याच्या या गोड सुरीने माझा खिसा आणखीनच कापला जाणार याची जाणीव मला झाली होती.
दिवाळी म्हटली की लहान मुलांच्या खरेदीसाठी खरं तर मुलांपेक्षा पालकांमध्येच अधिक उत्साह संचारलेला असतो. मुले फटाके, सुरकांड्या, भुईनळे इ. नको नको म्हणत असतांना काही पालक मात्र स्वतःची खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी हजारो रूपयांची खरेदी करतात. या प्रमाणेच चिल्ड्रन्स गारमेंटमध्येही मुले व पालकांची भरपूर गर्दी उडालेली होती. काऊंटरवर सेल्समन मागणीप्रमाणे ड्रेस दाखवत होते. चित्रपटाच्या नावांचे काही ड्रेस चांगले खपत होते. त्याच्या किंमती ऐकून मी ‘आता नको, नंतर घेऊ या’ म्हणून कटविण्याचा प्रयत्न केला.
परंतु सौ ने मात्र “अहो असं काय करताय!” कुठे जायला- यायला मुलाला चांगला ड्रेस नको का?” म्हणून मला साकडे घातले एवढंच नाही तर एवढ्या गर्दीतही डॉ. बाबासाहेबांचा विचार “माणसाचा ‘ड्रेस’ आणि ‘अॅड्रेस’ चांगला असावा” तिने ऐकवला. आता मात्र मला काहीही बोलता येत नव्हतं. एवढ्या महान व्यक्तिमत्वाचा विचार तिने ऐकवल्यामुळे आपली बायको किती हुशार आहे. याचा त्यावेळीही मला अभिमान वाटला. मी बाळ्याच्या व सौ. च्या पसंतीने बाळ्याला चांगला थ्री पीस ड्रेस घेतला. (मुलगा किती भाग्यवानं! नाही तर बापाला फक्त एकच, तोही लग्नामध्येच थ्री पीस ड्रेस मिळाला होता. अजूनही तो जपून आहे. आता ढेरी वाढल्यामुळे बसत नाही ही अडचण आहे.)
सौ. ची व बाळ्याची दिवाळीसाठी कपड्यांची खरेदी झाल्याचे पाहून दुकानदाराने आता माझ्याकडे मोर्चा वळवला होता. मी आता बजेट संपलं म्हणत असताना दुकानदार, “अहो साहेब, बघून तर घ्या! चांगल्या कंपनीचे शुटीग-शर्टींग आलेय ! रेमंड, डिगजॅम, विमल!” वगैरे कंपनीची नावे सांगायला सुरवात केली. सौ. ने ही आम्ही सर्वांनी नवे कपडे घेतले मग तुम्हीच का घेत नाही! म्हणून मला नको असताना तिच्या पसंतीचा ‘स्काय ब्ल्यू’ रंगाचा सफारी खरेदी करण्यात आला. आता मात्र बिलाचा आकडा चांगलाच फुगला होता. फजिती नको म्हणून आगोदरच अधिक घेतलेले पैसे उपयोगी पडले. खिसा चांगलाच रिकामा झाला होता. एकाच खरेदीने एवढं दिवाळं काढलं होतं.
हे सर्व आठवल्यामुळे आज आणखी आपला किती खिसा कापला जाणार आहे या भितीने मी घाबरुन ताड्कन अंथरूणावरून उठून बसलो. तोच सौ. ने मला खुणेनेच शांतपणे झोपून राहण्याचा आदेश दिला. मी ही तिच्या सेवेत खंड नको म्हणून गुपचूप पडून राहिलो. सौ. माझे पाय दाबत होती. तिच्या चेहेऱ्यावर पती सेवेचे प्रसत्र समाधान दिसत होते. पण या सत्यवानाची (माझी) गत मात्र प्राण जातो की काय अशी झाली होती. तिने पाय दाबत असताना सुखद वाटण्यापेक्षा पायाचे हाड मोडते की काय असे वाटू लागले होते. माझ्या चेहेऱ्यावरील वेदना बघून सौ.ने “बरे वाटत नाही का नाथ?” म्हणून सावित्रीने सत्यवानाला विचारावं तसं कोमल स्वरत विचारलं. मला सौ. मधील अचानक हा असा बदल काही कळत नव्हता. मग तिनेच आज ‘ वट पौर्णिमा ‘ असल्याचे सांगितले.
पुराणात सावित्रीने आपल्या पतीचे (सत्यवानाचे) प्राण मोठ्या चातुर्याने यमाकडून कसे परत मिळवले याची सविस्तर कहाणी तिने ऐकवली. सत्यवान शूर व रूपवान असला तरी तो अल्पायुषी आहे हेदेवर्षी नारदांना ठाऊक होते. यामुळे त्यांनी व अश्वपती राजाने (सावित्रीचे वडील) सावित्रीला दुसऱ्या वराची निवड करण्यास सांगितले. परंतु ज्याला मी मनापासून वरले आहे. त्याच्याहून दुसऱ्या पुरूषाचा मी विचारही करणार नाही. असे सावित्रीने प्रतिज्ञा पूर्वक सांगितले. व सत्यवानाशीच विवाह केला.
काही काळ लोटल्यानंतर एकेदिवशी सत्यवान लाकडे तोडून आणण्यासाठी रानात गेला तेव्हा सावित्रीही त्याच्या बरोबर गेली. कारण नारदमुनींच्या सांगण्यावरून सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस तिला माहित होता. लाकडे फोडून झाल्यावर अतिश्रमामुळे सत्यवानाला ग्लानी आली, म्हणून एका वडाच्या झाडाखाली सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून तो झोपला. थोड्याच वेळात सत्यवानाचे प्राण नेण्यासाठी स्वतः यम तेथे आला. सावित्रीने त्याला ओळखले व नमस्कार केला. क्षणभरातच सत्यवानाचे प्राण हरण करून यम जाऊ लागला.
तशी सावित्रीही त्याच्या मागून निघाली. यमाने तिची समजूत घालून तिला परत जाण्यास सांगितले. तेव्हा सावित्रीने यमाची स्तुती करून पतिव्रतेच्या कोमल भावना, तिची पतिनिष्ठा व कर्तव्य या संबंधी विद्वत्तापूर्ण विवेचन केले तिच्या वाक्चातुर्याने यम प्रसन्न झाला आणि त्याने तिला चार वर देऊ केले. तेव्हा सावित्रीने त्याच्याकडून पहिल्या वराने श्वसुराला दृष्टी, दुसऱ्या वराने त्याला राज्यप्राप्ती, तिसऱ्या वराने आपल्या निपुत्रिक पित्याला पुत्रलाभ आणि चौथ्या वराने स्वतःला पुत्रलाभ म्हणजेच युक्तीने सत्यवानाचे पतीकुळाचा व पित्याच्या कुळाचा उद्धार केला. आणि स्वतःच्या अलौकिक गुणांमुळे ती जगात अजरामर झाली.
एकंदर जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून सुवासिनी स्त्रिया वट पौर्णिमे ला वडाच्या झाडाची पूजा करतात- सौ. ने आपल्या कहाणीचा शेवट केला. “परंतु पुरूषांना जर पुढच्या जन्मी ‘चेंज’ हवा असेल तर काय करायचे बुवा?” मी.यावर सौ. म्हणाली, “नो चेंज! म्हणून तर आम्ही वडाच्या झाडालाही दोऱ्याने बांधून टाकतो.”
परंपरेने चालत आलेल्या या प्रश्नांनी मी खरेच भारवून गेलो होतो. किती कोमल प्रतिके वापरून स्त्रिया स्वतःभोवती संरक्षक कवच तयार करतात याचे मला आश्चर्य वाटले. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाच्या हाताला साधा धागा बांधून स्वतःच्या संरक्षणाची किती मोठी जाबाबदारी भावावर टाकीत असते. किती शक्ती असते त्या धाग्यात! एवढासा धागा बहिणीच्या संरक्षणाची हमी सांगतो. खरंच द ग्रेट ! भारतीय स्त्री खूप महान आहे. जगाच्या पाठीवर भारतीय स्त्री सारखी आर्य स्त्री सापडणार नाही. मला मनूचे वचन आठवले, “यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता”
व्रत वैकल्याद्वारे भारतीय संस्कृतीची जोपासना करणाऱ्या स्त्रियांचा मला अभिमान वाटला. सौ.ने पुजेला जाण्यासाठी सर्व यथासांग तयारी पहाटेच करून ठेवली होती. लग्नाचा हिरवा शालू घातला होता. नाकात आईने दिलेली मोत्याची नथ घातली होती. अंगावर दागिने घातले होते. सर्व सौभाग्यलंकारांनी युक्त अशी पूजेला जाणारी कुठलीही स्त्री नेहमीच सुंदर दिसते. तशी सौ. ही मला सुंदर दिसत होती. तिने जाताना ‘मी येते हं!’ म्हणून सांगितले मी मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिलो. थोड्या वेळाने माझ्या तोंडून उद्गार बाहेर पडले, ‘सावित्री- द बेटर – हाफ’
Vat Purnima
Read more माझे अमेरिका स्वप्न